परळी नगर पालिकेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात-आर.एस.फड

परळी नगर पालिकेचे गुत्तेदार व कर्मचारी भ्रष्टाचारात गर्क; नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ – राजेभाऊ फड
वेगवान मराठी केशव मुंडे दिनांक – 26 डिसेंबर परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ शहर हे ज्योतिर्लिंग क्षेत्र असून वैद्यनाथ प्रभूंच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे. देशभरातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. इथली व्यवस्था आणि ओळख घेऊन ते बाहेर जातात. याचे नगर पालिकेला कदाचित भान राहिलेले नाही अशी अवस्था झालेली दिसतीये. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे रोगराई वाढत चालली आहे. शहराची पालक संस्था असलेल्या नगर पालिकेची वास्तूचं घाणीच्या विळख्यात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीची बकाल अवस्था झालेली आहे. म्हणूनच घाणीच्या साम्राज्यात बसून काम करणारे लोक शहराची काय स्वच्छ्ता करतील? अशी शंका वाटते. भ्रष्टाचारात आणि मलिदा करण्यात गुंग आणि गर्क असलेल्यांना नागरिकांच्या आरोग्याचे काहीही देणेघेणे नसल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी नगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरी प्रश्नांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा जनतेसमोर वाचून जनजागृती करण्याचा इशारा फड यांनी दिला आहे. नागरी समस्यांबाबत त्यांनी अनेकवेळा नगर पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुधारणा करण्याबाबत सूचित केले. मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेले निगरगट्ट कर्मचारी मात्र त्यांच्याच धुंदीत वागत असल्याचे दिसून येते.
परळी नगर पालिका शहर स्वच्छतेसाठी महिन्याकाठी जवळपास 30 लक्ष रुपये खर्च करते. 500 कर्मचारी स्वच्छता विभागात काम करतात असे कागदोपत्री दाखवले जाते, मात्र वास्तवदर्शी फक्त 100 ते 150 लोकच काम करत असल्याचे नेहमी दिसते. बाकीच्या काही बोगस लोकांची नावे लावून पैसे उचलण्याचे प्रताप केले जात आहेत.
शहरातील अनेक भागांतील नाल्या तुंबलेल्या आहेत, रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, शहरातील मोठ्या ओढ्यातील तुंबलेला कचरा काढला जात नाही, डास प्रतिबंधक फवारणी केली जात नाही, मोंढा भागात आणि व्यापरपेठेत सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे.
यामुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत असून रोगराई वाढत चालली आहे. भ्रष्टाचारात आणि फुकटचे पैसे लाटण्यात गुंग आणि गर्क असलेले नगर पालिका प्रशासन शहराची काय स्वच्छता करणार? असा सवाल राजेभाऊ फड यांनी विचारत नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वेळीच या परिस्थितीत सुधारणा केली गेली नाही तर यावर तीव्र लोकआंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.
नगरपालीकेची इमारतच बनवली कचरा डेपो ! नगर पालिकेची इमारतच बनवली कचरा डेपो !
परळी वैजनाथ शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे शहरात स्वच्छतेची स्थिती गंभीर असताना दुसरीकडे नगर पालिकेच्या इमारतीचा कचरा डेपो झाल्याचे चित्र आहे. हे असले निष्क्रिय प्रशासन काय स्वच्छता करणार आणि नागरिकांची काय काळजी घेणार? याबाबत चिंता वाटत असल्याचे राजेभाऊ फड यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी कार्यालयाच्या भिंतीच थुंकून थुंकून लालेलाल झालेल्या आहेत. इमारतीच्या आवारातच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे.
