महाराष्ट्र

महाराष्ट्रातून जाणारा नवीन रेल्वे मार्ग असा सुरु होणार

New Railway Line Maharashtra

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे

मुंबई, ता. 8  : सेमी हायस्पीड प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी चौथ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ६ डिसें) झालेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत  सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिली. The new railway line passing through Nashik will gain momentum

या सेमी हायस्पीड प्रकल्पाला मागील काही वर्षात अनेक अडचणी आल्या आणि प्रकल्प रखडला आहे. याबाबत खासदार पदी निवडून येताच राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्यात रेल्वे शिर्डी मार्गे होणार की संगमनेर मार्गे होणार असा प्रश्न होता. मात्र खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होईल असे निश्चित करण्यात आले.

दरम्यान, महारेलच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आराखड्यात (डीपीआर) नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालवली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बिणी) या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.

मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाला लक्षात येताच त्याबाबत आता नव्याने आराखडा (डीपीआर) बनवण्याच्या कामाला खासदार राजभाऊ वाजे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीनंतर मान्यता देण्यात आली. नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्पाला वळसा घालून नव्याने रेल्वे मार्गाचा डीपीआर बनवला जात आहे. शुक्रवारी (दि. ६ डिसें.) रोजी झालेल्या बैठकीत नवा डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिली.

काय होती अडचण

महारेलने बनवलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ मधून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, नव्याने तयार होत असलेल्या डीपीआरमध्ये जीएमआरटीला वळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान ६० ते ९० किमी अंतर वाढून अर्धा तासाचा वेळ वाढणार आहे.

हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत तसेच जुन्याच मार्गाने मार्ग होण्याबाबत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील आग्रही आहेत. त्यामुळे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे हे या दोन्ही नेत्यांना देखील लवकरच पत्राद्वारे किंवा समक्ष भेटून प्रकल्प लवकर सिद्धीस जाण्यासाठी वयक्तिक लक्ष घालावे अशी विनंती करणार आहेत.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजभाऊ वाजे यांच्या बैठकीत मंत्री म्हणाले की, “या पंचवार्षिक काळात देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे, त्यामुळे हा प्रकल्प देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू”. दरम्यान, खासदार राजभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुरवठ्यामुळे ते देखील या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत.

नाशिक – पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा माझ्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. आता नव्याने बनवला जात असलेला डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशना पर्यंत याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी मिळावी असा प्रयत्न करत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देखील विनंती करणार आहे. : त्यामुळे नाशिक ते पुणे हा नवीन रेल्वे मार्ग आता सुसाट सुटणार यात शंका नाही.

_ खासदार राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे
(लोकसभा सदस्य, नाशिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!