परळीतील शेतकऱ्यांची पिळवणुक थांबवा -गीत्ते

परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट
भाजीपाला आडत दुकानदाराकडून शेकडा १०% शेतकऱ्यांकडून आडत घेत असलेली रक्कम बंद करावी-वैजनाथ गित्ते
वेगवान मराठी -परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-केशव डी.मुंडे दिनांक-१८ फेब्रुवारी 2025 परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. आधीच शेतीमालाला भाव नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला असताना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मात्र शेतकऱ्यांची मनमानी पद्धतीने लूट होत आहे. शेतकऱ्याकडून दहा टक्के आडत म्हणून रक्कम वसूल केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन ही पाठवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची होणारे लूट तात्काळ थांबवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे बीडचे जिल्हाधिकारी यांना नंदागौळ येथील शेतकरी वैजनाथ ज्ञानोबा गित्ते यांनी केली आहे.
याबाबत बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती परळी-वै. हे शेतकऱ्यांकडून आपले स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी बसलेल्याकडून प्रत्येकी दररोज २० रुपये प्रमाणे वसुली करत आहेत.
श्री. सदाभाऊ खोत हे पणन सहकार राज्यमंत्री असताना कोणत्याही शेतकऱ्याकडून शेतकऱ्याच्या कोणत्याही मालावर आडत वसुली किंवा इतर कर लावला जाणार नाही
या संदर्भात जा.क्र. पणन-५/कृउबास/अडत/२०१४/४०७० दि.२० डिसेंबर २०१४ चा शासन निर्णय आहे. परंतु मार्केट कमेटीचे कर्मचारी गरीब शेतकऱ्यांकडून प्रत्येकी २० रुपये दररोज करीत असलेली वसूली ८ दिवसांमध्ये बंद नाही केल्यास मा. सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल.
जवळपास ३०० शेतकरी दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती/नगर पालिकाच्या जागेत स्वतःचा भाजीपाला विकतात. त्याप्रमाणे प्रति शेतकऱ्यांकडून २० प्रमाणे दररोज ६००० रुपये वसुली केली जाते. त्याप्रमाणे महिन्याचे १,८०,०००/- रुपये तर वर्षाला २१ लाख ६० हजार रुपये शेतकऱ्यांकडून वसुल केले जातात.
तसेच परळी येथील भाजीपाला आडत म्हणून शेतकऱ्यांकडून १० टक्के रक्कम कपात केली जाते. वास्तविक महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी ही आडत आकरल्या जात नाही.
मात्र हे सर्व प्रकार फक्त बीड जिल्ह्यातच घडत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. येथील भाजीपाला इतर ठिकाणी घेवून जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येत आहे.
तरी मा. सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वै. जि.बीड याच्यावर शेतकऱ्याची फसवणुकीचा गुन्हा दाखल करून व संबंधित भाजीपाला आडत दुकानदार यांच्यावर सुद्धा शासन निर्णय डावलून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्या प्रकरणी त्यांच्यासुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.
अन्यथा परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आमरण उपोषण करावे लागेल याची गांभीर्याने दखल घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वैजनाथ गित्ते यांनी म्हटले आहे.