कैलास फड यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा रितसर परवाना

परळी प्रतिनिधी  26/12/2024 :- परळी येथे रिव्हॉल्वर मधून हवेत फायर करणाऱ्या कैलास फड यास परळी शहर पोलीसांकडून अटक.

दिनांक २३/१२/२०२४ रोजी सोशल मिडीयावर रिव्हाल्वर मधून हवेत गोळीबार करणाऱ्या परळी येथील इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर व्हीडीओ मधील व्यक्ती ही कैलास बाबासाहेब फड, रा. कन्हेरवाडी, ता. परळी, ह.मु. बँक कॉलनी, परळी वै. असल्याची परळी शहर पोलीसांची खात्री झाली. तसेच सदर इसमाच्या ताब्यात असलेल्या शस्त्राबाबत खात्री करण्यात आली असता कैलास बाबासाहेब फड याच्याकडे मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयाकडील दिनांक २७/०२/२०२३ रोजीचा शस्त्र परवाना असल्याची तसेच त्याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली.

आरोपी कैलास बाबासाहेब फड याने त्याच्याकडील परवाना प्राप्त असलेल्या रिव्हॉल्वरमधून हवेत फायर केलेल्या घटनेबाबत माहिती घेता सदरची घटना ही सुमारे एक वर्षापुर्वीची असून त्याने त्याच्या घरासमोरील वाहनाची पुजा करतांना हवेत फायर केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. परंतू आरोपी कैलास बाबासाहेब फड याने मा. जिल्हाधिकारी यांचे शस्र परवान्यातील अटी शर्तीचे उल्लंघन करुन रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केलेले असल्याने पो.स्टे. प्रभारी अधिकारी, परळी शहर यांचे आदेशावरुन फिर्यादी विष्णू उद्धवराव फड, पोलीस शिपाई, पोलीस ठाणे परळी शहर यांनी सरकारतर्फे पो.स्टे. परळी शहर येथे फिर्याद दाखल केली. त्यावरुन गुरनं. १९५/२०२४, कलम ५/२७, ३० भारताचा शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपी कैलास बाबासाहेब फड यास आज दिनांक २६/१२/२०२४ रोजी दुपारी अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची ०१ दिवसाची पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. अधिक तपास मा. पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चोरमले, पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वाय. बी. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. परळी शहर हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!