
परळी वैजनाथ येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन
मराठवाड्याच्या प्रगतीची नवी पायाभरणी
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
“समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा” घडवण्याचा संकल्प_ना.पंकजा गोपिनाथ मुंडे
वेगवान मराठी परळी प्रतिनिधी -केशव डि मुंडे दिनांक 15ऑगस्ट 2026 शनिवार परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण मिळण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांच्या समृद्धीला नवीन दिशा मिळणार आहे.
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आ. नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, संजय दौंड, बदामराव पंडीत, पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगराध्यक्षा परळी -वैजनाथ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन्. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत कावत, अजय मुंडे, अक्षय मुंदडा, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा आणि मराठवाडा ही कष्टाची खाण आहे. शेतीला मुख्य आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. ह्या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील मुले- मुलींसाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे महाविद्यालय उपलब्ध होणार आहे. , या महाविद्यालयामुळे अत्याधुनिक शिक्षण आणि सुविधा उपलब्ध होतील. ज्याचा लगतच्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे.
६३४ कोटी रुपयांची भरघोस तरतूद, सुसज्ज इमारत, वसतिगृह (हॉस्टेल), अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र. आजूबाजूच्या ५० ते १०० गावांतील जनावरांवर आधुनिक उपचार परळीतच होणार. दूध उत्पादन वाढवणे आणि फायदेशीर शेळीपालनावर संशोधन केले जाईल.
या महाविद्यालयातून केवळ नोकरी मागणारे डॉक्टर नव्हे, तर पेट केअर क्लिनीक, डेअरी सल्लागार आणि पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात नोकरी देणारे तरुण उद्योजक तयार व्हावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षातच येथील प्रवेश सुरू केले जातील असेही त्या म्हणाल्या.
या महाविद्यालयाचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले असून तसेच “समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा” घडवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार धनंजय मुंडे म्हणाले की परळी येथे पशुवैद्यक महाविद्यालय याच्यासोबत कृषी महाविद्यालय ते देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहे याचा आनंद आहे. बारामती येथील कृषी प्रदर्शनात अजितदादांनी याची घोषणा केली होती त्यामुळे बारामती येथील पशुवैद्यक महाविद्यालयाला स्व. अजितदादा यांचे व परळी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाला स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव द्यावे असेही श्री धनंजय मुंडे म्हणाले
या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून परळी परिसरात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पशुपालकांना त्यांच्या व्यवसायाच्या मदतीसाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पशुसंवर्धन खात्याची मंत्री या नात्याने या महाविद्यालयास स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव घेण्याची ग्वाही मी देते असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.






