या जलकन्येचा मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प

वेगवान मराठी/ विजय चौधरी
सोलापूर : येथील जुना पुना नाका, वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी, ”मधुमंगल” मधील रहिवासी श्रीमती भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलाय. त्याच वेळी त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्णीवाल नेत्रपेढीलाही लिखीत स्वरूपात कळवलीय.
कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं, वैद्यकीय क्षेत्रातील नवं-नवं संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी अवयवदानही सहजशक्य होऊ लागलंय. त्यातच आपल्या मरणोपरांतसुद्धा या देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी भावी डॉक्टरांना उपयोग व्हावा, असा सकारात्मक विचार करून मरणोत्तर नेत्रदान-देहदान करण्याचा संकल्प कळविणारेही समाजात अनेक जण आहेत.
अशा अनेकात एक नांव सोलापुरातून वाढलंय, ते नांव भक्ती जाधवांचं ! प्रा. मधु जाधव यांच्या सुकन्या भक्ती जाधव. भक्ती जाधव ही एक व्यक्तिच नाही तर विचार म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातंय. त्या सोलापूर जिल्ह्याच्या पटलावर ‘ जलकन्या ‘ म्हणून सर्वदूर परिचीत आहेत.
