बीडमहाराष्ट्र

पंढरपुर तिर्थक्षेत्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा काय आहे इतिहास

Very detailed information about Pandurang Vitthal Rukmini Temple and Punyashloka Ahilyabai Holkar at Pandharpur, obtained from the writings of Habap Data Maharaj Andhale Parlikar

सर्व सुख विठ्ठल पायीं जाणे होळकर अहिल्याबाई –

हभप दता महाराज आंधळे परळीकर यांच्या लेखणीतुन प्राप्त झालेली पंढरपुर येथील,पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल ची अत्यंत सुक्ष्म माहिती

केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वैजनाथ दिनांक 8 जुलै 2025 मंगळवार  पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि पती खंडेराव होळकर यांची पंढरपुरच्या विठ्ठल रुखमाईवर वर नितांत श्रध्दा दिसुन येते. त्यांच्या देवघरात श्री.विठ्ठल रुख्मिणी आजही पहायला मिळतात.

अहिल्यादेवी आणि खंडेराव होळकर या दाम्पत्याने पंढरपुरच्या श्री विठ्ठल रखुमाई पुजेसाठी विविध प्रकारच्या सेवा सुरु केल्या होत्या.श्री विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी वार्षिक पंचेचाळीस रुपयांचा करार खंडेरावांनी करुन दिला होता.

तर रखुमाईच्या पायात घालण्यासाठी रमझोन नामक दागिना पाठविला आहे. तो रोज घातला पाहिजे. सांगितल्या प्रमाणे झाले नाही तर जाब विचारण्यात येईल असे पत्र उत्पातांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी 6 एप्रिल 1750 रोजी पाठवले होते.

महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता श्री पांडुरंगाच्या अभिषेकासाठी काशीहुन कावडीने गंगेचे पाणी आणण्यासाठी कायम स्वरुपी रक्कमेची तरतूद करुन मुद्दलाला हात न लावता त्याच्या व्याजातुन हा खर्च भागला पाहिजे. अशी व्यवस्था अहिल्यादेवी होळकर यांनी करुन ठेवलेली आहे.

श्री. विठ्ठल रुख्मिनीला दररोज तुळशीमाळ अर्पण करण्यासाठी पंढरपूर येथे तुळशीबाग निर्माण करुन तेथील बागेतून दररोज श्री. विठ्ठल रुख्मिनीला तुळशीमाळ अर्पण करण्यात येत असे.

आजही पंढरपूर येथे तुळशीबाग परिसर असुन तुळशी बागेच्या जागेवर अतिक्रमण झालेले दिसून येते. सदरची जागा होळकर सरकारच्या नावे आहे. अहिल्यादेवींनी पांडुरंगाला महाशिवरात्री निमित्ताने गंगा जलाभिषेकासाठी कावड सुरू केली होती.

या कावडीसाठी एकोनीस रुपये आठ पैसे तर पंढरपूर येथे वारक-यांसाठी सुरू केलेल्या अन्नछत्रासाठी मौजे बोहाळी, परगगणे कासेगाव पंढरपूर कडुन एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

बोहाळी येथे राम मंदिर असुन तेथील इनाम जमीन केवळ गाईगुरांच्या चा-यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पंढरपुरच्या बाजारातून पाढं-या घोंगड्यांची आवश्य खरेदी करीत असत. त्यांच्या गादीवर असलेली पांढरी घोंगडी ही पंढरपूरची असे.

होळकर कालीन पत्रसंग्रहांत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे एक पत्र कं २६. उपलब्ध असुन त्यातील मजकूर पुढील प्रमाणे आहे. ता. ९ डिसेंबर इ. स. १७८६. यशवंतराव फणसे यांचे मुक्काम पंढरपूराहून मातोश्रींस पत्र. कार्तिक शुद्ध द्वितीया मंगळवार. शुद्ध प्रतिपदेस लासलगांवहून स्वार होऊन येथें आलो.

देवदर्शन करून श्रींचा निरोप घेऊन आज श्रीनरसिंहपूर, जेजुरी देवदर्शन करून निफाडीं येऊन वडिलांचे भेटीस आज्ञेप्रमाणें येऊ. श्रींचा प्रसाद-बुक्का, गोपाळकाल्याचा प्रसाद लाह्या, पायांवरील बुक्का व श्रीवैकुंठ स्वामींनीं प्रसाद खडीसाखर पुडीत घालून वडिलांकरितां दिला,

तो पाठविला आहे. प्रविष्ट झाल्याचें आशीर्वाद पत्र यावें. कर्नाटकी घोगड्या पांढऱ्या दोन पाठविल्या आहेत; पावतील. सौभाग्यवती रखमाबाई होळकर (तुकोजी बाबांचे कुटुंब) कार्तिकेचे यात्रेस आल्या. भेट झाली. लष्करांत सरंजामा सुद्धां जावे म्हणोन बोलल्या.

ऐसियासी पागा टोकेस कामगिरीस आहेत, त्यास मातोश्री बाईसाहेबांस लिहून पाठवू. तिकडून सरंजाम आल्यास लष्करात सरंजामा सुद्धा जाणें घडेल, येविषयीं वडिलांचें उत्तर येईल तशी वर्तणूक घडेल.

श्री.यशवंतराव फणसे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जावई असुन गोविंदराव फणसे यांचे पुत्र आहेत. (PHANSE SARDAR ) फणसे हे होळकरांचे सोयरे असुन होळकर आणि फणसे परिवारात पुर्वांपार नातेसंबंध आहेत.

निफाड,इंदौर,मल्हारगड,हनुमंतगाव येथे फणसे जहागीरदार व पाटील परिवारांचे वास्तव्य आज पहायला मिळते.

पंढरपूर येथे श्री. विठ्ठल रुख्मिनी मंदिरा समोर महाद्वाराला खेटून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी होळकरवाडा (HOLKARWADA) निर्माण केलेला असुन

या वाड्यात श्रीराम मंदिर आहे. मंदिरात राम पंचायतन तसेच प्राचीन हनुमानाची मुर्ती आहे.पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी, वाटसरू ,

भाविकांच्या सेवेसाठी होळकर वाड्याची निर्मिती करुन अन्नछत्र सुरू केले होते. तसेच चंद्रभागेतून वारकऱ्यांना पार करुन देणा-या नावाड्यांना सेवेबद्दल वार्षिक वर्षासन सुरू केले होते. पंढरपूर परिसरात दिंडी मार्गावर अनेक बारवा निर्माण केलेल्या आहेत.

श्री.विठ्ठलाच्या गर्भगृहात चांदीचा पत्रा लावून त्यावर “सर्व सुख विठ्ठल पायी जाणे होळकर अहिल्याबाई ” अशा दोन ओळी कोरलेल्या दिसून येतात.

पंढरपूर येथील ह.भ.प श्री. प्रल्हाद महाराज बडवे घराण्यांकडे वंशपरंपरागत मान आणि पुजेचा अधिकार दिलेला असुन आजही बडवे घराण्यांकडे अहिल्यादेवींचे पत्र पहायला मिळतात.

होळकर राजघराण्यांचे वंशज,
उत्तराधिकारी,सरदार,मानकरी यांच्या हातून श्री.ची पुजा अर्चा करण्याची परंपरा सुरू होती.

ती परंपरा आजही सुरू आहे. होळकरवाडा व्यवस्थापक श्री.आदीत्य फत्तेपुरकर यांना देवस्थान समिती कडून यथोचित सन्मान दिला जातो.

त्यांचेपुर्वी श्री. आनंदराव होळकर हे दीर्घकाळ होळकर वाड्याचे व्यवस्थापक होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी इंदौर आणि महेश्वर येथे श्री. विठ्ठल रुख्मिनीचे पंढरीनाथ मंदिर निर्माण केलेले आहे.

इंदौर शहरातील पंढरीनाथ मंदिर लांभाते यांनी निर्माण केलेले आहे. वारी,वारकरी आणि आषाढी एकादशीचा वारसा अहिल्यादेवींनी नर्मदेच्या पलिकडे राहुनही जतन आणि समृद्ध केला

तसेच महेश्वर येथून आषाढी वारी निमित्त पालखी सोहळा सुरू करुन विठुराया चरणी नतमस्तक होत महाराष्ट्राची मराठमोळी सांस्कृतिक परंपरा जपली.

✒️ ॲडव्होकेट,हभप,संशोधन ग्रंथकार -दतात्रय आंधळे महाराज परळीकर 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!