Farewell to Mansu मान्सून काय दिवा लावणार! मान्सूचा निरोप आला….
दुष्काळाच्या डोहात महाराष्ट्र यंदा चांगलाच होरपळला, पाण्याची किमंत सर्वांना समजली. पाण्यासाठी युध्द ही वाक्य रचना खरोखर उतरु शकते...अश्यातचं मान्सूचा सांगावा आलायं...

वेगवान मराठी / wegwan marathi news
नाशिकः, 17 एप्रिल 2024 Let’s talk about monsoon
जिवाची काहिली w सुरू असल्याने सर्वत्र वातावरण तप्त आहे. सत्ताधारी, विरोधकांच्या एकमेकांवरील आरोपामुळे या वातावरणात अधिकच भर पडत आहे. अशा वेळी बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा देणारा सांगावा मॉन्सूनने धाडला आहे. त्यामुळे सर्वांनाच हायसे वाटले आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन १५ मेपर्यंत होणार असून, देशात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ९१.५ सेंटिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या कालावधीत साधारणत ८७ सेंटिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही देशात यावेळी १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खासगी व शासकीय हवामान विभागाचा अंदाज यावेळी जवळपास मिळताजुळता आहे. नाहीतर हवामान विभागाचा अंदाज म्हणजे वराती मागून घोडे असाच काहीसा प्रकार असल्याचा समज आहे. हवामान विभागातील तज्ज्ञ व भारतीय हवामान यांच्यात पटत नसल्याने त्यांचे ठोकताळे नेहमी चुकतात, असे चेष्टेने म्हटले जात असे. मात्र, आधुनिक उपकरणे व मॉन्सूनचा अंदाज लावायच्या अनुमान पद्धतीत आमूलाग्र बदल झाल्याने काही वर्षांपासून हवामान विभागाने वर्तवलेले पावसाबाबतचे अंदाज खरे ठरू लागले आहेत.
यंदाही हवामान विभागाने सुखावणाऱ्या सरींनी महाराष्ट्र चिंब होणार असल्याचे शुभसंकेत दिले आहेत. सध्या प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एल निनोचा प्रभाव कमी होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम मॉन्सूनच्या आगमनावर होणार आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान समाधानकारक पाऊस पडेल. प्रशांत महासागरातील समुद्राच्या तळातील तापमानावरून निर्माण होणारी परिस्थिती म्हणजे एल निनो व ला निना होय. मॉन्सूनच्या आगमनावेळीच एल निनोचा प्रभाव कमी होऊन मॉन्सून सक्रिय होईल.
मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ला निना स्थिती तयार होऊन यादरम्यान दमदार पावसाची शक्यता आहे. एल निना संपून ला निना सुरू होण्याची मागील ७३ वर्षांतील ही दहावी वेळ ठरणार आहे. याआधी नऊ वेळा अशी परिस्थिती निर्माण होऊन दोन वर्षे सरासरी व त्याहून अधिक पाऊस झाला. एकंदरीत मॉन्सूनला पोषक असणाऱ्या नैसर्गिक हालचाली यावर्षी जुळून येत असल्याचे शुभसंकेत सध्या तरी भारतीय हवामान विभागाला प्राप्त झाले आहेत.
त्यामुळेच त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी पत्रकार परिषद घेत मॉन्सूनचा हा सांगावा जाहीर केला आहे. जगाचा विचार करता भारतातच प्रामुख्याने तीन ऋतूंचा अनुभव घेता येतो. यात उन्हाळा, हिवाळा व सर्वाधिक महत्त्वाचा समजला जाणारा पावसाळा याचा समावेश आहे. पडणाऱ्या पावसावरच भारतातील शेती फुलते. भारत हा कृषिप्रधान देश असला, तरी येथील कृषी क्षेत्राची भिस्त पावसावर अवलंबून असते. त्यामुळेच बळीराजासह सर्वांचे डोळे मॉन्सूनच्या आगमनाकडे असतात.
निसर्गाचे स्वतःचे एक चक्र आहे. या निसर्गचक्रातील एक घटक असणाऱ्या पावसावरच भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्र अवलंबून आहे. चांगला पाऊस पडल्याने कृषी उत्पादन वाढून महागाई कमी होईल. मॉन्सूनच्या सांगाव्यानुसारच बळीराजा आपले पीक पेरणीचे अंदाजपत्रक तयार करतो. व्यापारी मॉन्सूनचा अंदाज घेऊनच बाजारात पैसा लावण्यास तयार होतात. कृषी उत्पादन वाढल्यास महागाई कमी होऊन देशांतर्गत सकल उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढले की, बाजारात पैसा खेळता राहील. बँकांचे व्याजदर कमी होऊन लोकांची क्रयशक्ती वाढेल. एवढा मोठा परिणाम एका मॉन्सूनमुळे भारतीय समाज व अर्थव्यवस्थेवर होतो.
बळीराजा तर या मॉन्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहतो. कारण रोजीरोटीसह त्याच्या वर्षभराचे गणित मॉन्सूनवरच अवलंबून असते. भारताला तिन्ही बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, हे खारे पाणी शेतीसाठी उपयुक्त नाही. शेती व तंत्रज्ञानात अत्याधुनिक बदल होत असताना इस्राईलसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. आपला कृषी विभाग शेतकऱ्यांना वारंवार इस्राईलचे तंत्रज्ञान दाखविण्यासाठी दौरे करतो.
मात्र, याच इस्राईलने समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करून केलेली प्रगती लक्षात घेत नाही. भारतातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे या शेतीला कधी जुगार, तर कधी आतबट्ट्याचा खेळ समजले जाते. निसर्ग हा लहरी नाही; परंतु मानवाने आपल्या बेजबाबदार व लहरी वागण्यामुळे निसर्गाच्या चक्रात अडथळा आणला आहे. ग्रह व तारे यांचे अनुमान लावत ऋषिमुनींनी ऋतुचक्र तयार केले आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडात तारे व ग्रहआपल्या मर्यादेत मार्गक्रमण करतात त्याचप्रमाणे ऋतुचक्राचे मार्गक्रमण सुरू असते. या ऋतुचक्राला मानवी हस्तक्षेप चालत नाही. आज मानवाच्या मनमौजी वागण्यामुळे ऋतुचक्र बिघडले आहे. त्यामुळेच अवकाळी पावसासारख्या घटना घडत आहेत. आज हवामान विभागाने मॉन्सूनची वर्दी दिली असली, तरी मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या अवकाळीने आत्तापर्यंत दोघांचे बळी घेतले आहेत. शेतातून उन्हाळ्यात डौलाने उभी राहणारी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुढील काही दिवसांत पुन्हा राज्यातील अनेक भागाला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण व चांदवड या तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला. त्यामुळे कांद्याबरोबरच द्राक्ष, आंबा या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सारेच दंग असल्याने बळीराजाचा हालहवाला विचारायला कोणी तयार नाही.
आज महाराष्ट्रातील अर्धा भाग अवकाळीग्रस्त बनला आहे. गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ पाहता यावर्षी दुष्काळ व उन्हाचे चटके एप्रिलच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागले आहेत. राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष बघता दिवसेंदिवस राज्यात टँकरची संख्या वाढू लागली आहे. अवकाळी पाऊस फक्त नुकसान करून जातो. अशा बिकट परिस्थितीत बळीराजाला मॉन्सूनचा सांगावा आल्याने आशेचा किरण दिसत आहे.
सदर लेख वरीष्ठ पत्रकार चंद्रशेखर शिंपी यांच्या सौजन्याने अग्रलेखातून घेतला आहे.
प्रश्न
भारतात मान्सून शेवटचा कोणत्या राज्यात येतो?
मान्सून म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
भारतात मान्सून कशामुळे येतो?
मान्सूनची वैशिष्ट्ये काय आहेत?







