मंत्रीपद न दिल्याने छगन भुजबळ अजीत पवारांना सोडणार !

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 17 – मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज नाही. मात्र, मला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं, त्यामुळे मी दुःखी आहे, असं स्पष्ट करत छगन भुजबळ यांनी पक्षनेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिला. वृत्तवाहिनीशी बोलताना ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’, असं सूचक विधान त्यांनी केल्याचे याची दिवसभर चर्चा झाली. कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार भुजबळ यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा अशी मंत्रिपदे आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणून देखील काम केलेलं आहे. शिवसेनेचा एकटा आमदार असतानाही मी सर्वांना तोंड देण्याचं काम केलं. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही. ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं. त्यामुळे मी दुःखी आहे. मंत्रिपदे येतात आणि जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना शरद पवार यांच्याबरोबरही मी होतो. तसेच अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबरही मी होतो, असं छगन भुजबळांनी म्हटलं.
जेव्हा ओबीसींचा लढा झाला, बीडमध्ये काही आमदारांची घरं पेटवली गेली. तेव्हा मी स्वतः बीडमध्ये गेलो आणि तेव्हा मी ठरवलं की मी शांत बसणार नाही. त्यानंतर मी माझा आवाज उठवला. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी मी राजीनामा दिला होता आणि अंबडला ओबीसी मेळाव्यासाठी गेलो होतो. मात्र, तेव्हा मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले आणि राजीनाम्यासंदर्भात काही बोलू नका असं सांगितलं होतं, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
मी रोखठोक बोलतो ही माझी सवय आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे आणि अन्याय होत असेल तोपर्यंत मी संघर्ष करत राहणार आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, आता पुढची भूमिका काय ? असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेशी आणि अनेक कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते मी ठरवणार आहे. मात्र, एक आहे की जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं








