
!! चार्जशीटमधून नावे गायब करण्याचा कट? राजस्थानी मल्टी प्रकरणात खळबळ !!
!! राजस्थानी मल्टी प्रकरणातील संचालक विजय लड्डा आणि अशोक जाजू यांच्याविरोधात ठेवीदारांचा गंभीर दावा !!
वेगवान मराठी परळी / प्रतिनिधी दिनांक-11 जुलै 2026-
राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले असताना, काही संचालक मात्र बनावट व खोट्या राजीनामा पत्रांच्या आधारे विविध जिल्ह्यांतील दोषारोपपत्रातून स्वतःची नावे वगळून घेण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “संचालक स्वतःची सुटका करण्यात यशस्वी होत असतील तर ठेवीदारांना न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि ढाणखी येथील गुन्ह्यांमध्ये कथितपणे खोटे दस्तऐवज सादर करून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुरवणी दोषारोपपत्रातून नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर लातूर, धाराशिव, पंढरपूर, बीड आणि परभणी येथील प्रकरणांमध्येही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील दोषारोपपत्रांतूनही नावे वगळण्यात यश आल्याचा दावा करण्यात येत आहे.
ठेवीदारांच्या मते, जर संचालक मंडळातील एक एक व्यक्ती स्वतःची नावे दोषारोपपत्रांतून वगळण्यात यशस्वी होत असतील, तर हजारो ठेवीदारांना न्याय कसा मिळणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित संचालकांकडून जुन्या राजीनाम्यांच्या प्रती दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
राजस्थानी मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात आधीच हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडलेली असताना, आता बनावट राजीनामे, दोषारोपपत्रातून नावे वगळणे आणि गायब झालेल्या मालमत्तेच्या आरोपांनी या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
………….
चौकट
-राजीनाम्याचा दावा आणि 2023 मधील अर्जामुळे उपस्थित झालेला प्रश्न ?
विजय लड्डा यांनी 2017 मध्ये राजीनामा दिल्याचा दावा केला असला, तरी 2023 मध्ये एका कर्जदाराच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या व्याजात सवलत देण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलकर्णी यांना संचालक म्हणून अर्ज केल्याचा दावा ठेवीदारांनी केला आहे.
त्या अर्जावर संचालक म्हणून सहमती दर्शविण्यात आल्याचे पत्र उपलब्ध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
याशिवाय, संस्थेच्या विविध कार्यक्रम, शाखा उद्घाटने, स्थलांतर आणि इतर अधिकृत उपक्रमांच्या प्रसिद्ध झालेल्या पत्रिका व वृत्तांमध्ये संबंधित संचालकांची नावे सातत्याने प्रकाशित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
संस्थेच्या वार्षिक लेखापरीक्षण (ऑडिट) अहवालांमध्येही संबंधित संचालकाचे नाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
@ 60 लाखांचे फर्निचर नेमके कुठे गेले ? @
ठेवीदारांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. संचालक अशोक जाजू यांच्या मालकीच्या जागेत राजस्थानी मल्टीस्टेटची मुख्य शाखा स्थलांतरित करण्यात आली होती.
त्या ठिकाणी सुमारे 60 लाख रुपये खर्चून एसी, फर्निचर, टेबल, खुर्च्या, जनरेटर आणि इनव्हर्टर आदी साहित्य बसविण्यात आल्याचा दावा आहे.संस्था बंद झाल्यानंतर हे साहित्य गायब झाल्याचे सांगितले जात आहे..
याबाबत प्रशासकांकडे विचारणा केली असता घरमालकांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.हे साहित्य नेमके कुठे गेले?
आणि ते विकण्यात आले असल्यास त्यासाठी न्यायालय, प्रशासक किंवा आर्थिक गुन्हे शाखेची परवानगी होती का ? याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








