मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Government committed to provide Maratha reservation - Chief Minister Eknath Shinde

वेगवान मराठी बातम्या
नागपूर, 19 डिसेंबर 23 –
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
सर्वांची भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जी सगळ्यांची भावना आहे ती मुख्यमंत्री म्हणून माझीही भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भावना आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मराठा समाजाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिलं आहे. आज त्याच मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या त्यांना आरक्षण हवं आहे. अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजालाही प्रगती करायची आहे. त्यामुळे त्यांची मागणी रास्तच आहे. मराठा आरक्षणासाठी काहींनी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्याही केल्या. ही गोष्ट अतिशय वेदनादायी आहे. आपल्या सगळ्यां
च्या भावना यासाठी एकच आहेत. मराठा समाज सगळ्या समाजाशी मिळून मिसळून राहिला आहे. महाराष्ट्राची बांधणी घट्ट करण्याचं काम या समाजाने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं सामाजिक वातावरण, आपली परंपरा ही दुषित करण्याचे काही प्रसंग घडले आहेत. तसे काही प्रयत्न होताना आपण पाहतो आहोत. कुठल्याही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणं चांगलं नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांचीच भावना
माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी सगळ्या जातीपाती- सगळे धर्म हे समान आहे. प्रत्येक समाज घटकाला त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे ही समाजाची आणि सरकारची धारणा आहे. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. या आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध आहे. आपल्या सभागृहातलेही अनेक सदस्य शेतकऱ्यांची मुलं आहेत. बहुसंख्य मराठा समाज शेतकरी म्हणून राबतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही आपल्याला जाण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आहोत.
आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला तेव्हा काही ठिकाणी आंदोलनं आणि उपोषणं सुरु झाली. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. आपण पाहिलं की जी मागणी होती की कुणबी प्रमाणपत्रं आणि ज्या नोंदी आहेत त्याचा जीआर आपल्याकडे आहेत. ज्यांना पुरावे मिळाले आहेत त्यांना विरोध करण्याचं काही कारणच नाही. १९६७ पूर्वीच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना फायदा मिळाला पाहिजे हीच आपली भूमिका आहे.
काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते, काही ठिकाणी मिळत होते. त्यामुळे आपण प्रक्रिया सुरु केली. त्यात काही मतमतांतरे असू शकतात. पण ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दुसऱ्या समाजाला आरक्षण द्यायचं ही भावना सरकारची नाही. मराठा समाजाची मागणी आत्ताच पुढे आलेली नाही. ही पूर्वीपासूनची मागणी आहे. शाहू महाराजांनी १९०२ मध्ये आरक्षणाची तरतूद केली होती. १९८० च्या दशकापासून मराठा बांधव हा आपल्या आरक्षणासाठी लढतो आहे. अण्णासाहेब पाटील यांची आहुती यासाठी गेली. त्यानंतर आलेल्या सरकारने काय केलं? मी हा प्रश्न विचारुन वाद निर्माण करणार नाही. त्यात मला पडायचं नाही.
मात्र मी इतकंच सांगतो आहे की अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आपलं मागासपण सिद्ध करण्यासाठी या समाजाला मोठा लढा द्यावा लागतो आहे हे आपण पाहतो आहे. आजवर अनेक मराठा नेते झाले अनेक जण मोठे झाले पण मराठा समाजाच्या मागण्या त्यांनी दुर्दैवाने मान्य केल्या नाहीत. त्यांना आपल्या समाजाचं मन कळलं नाही असं घडलं असावं. जर ते कळलं असतं मराठ्यांना न्याय मिळाला असता ज्या गोष्टी इतिहासजमा झाल्या त्याविषयी मी बोलत नाही. काही लोक, काही नेते म्हणजे मराठा समाज नाही. मराठा समाज हा हलाखीच्या परिस्थितीत जगतो आहे. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या तो समाज मागास आहे. एक मराठा लाख मराठा या घोषणेसह राज्यात ५६ मोर्चे निघालेले आपण पाहिले. त्यांच्या शांततेतही एक आक्रोश आणि दाहकता होती. त्यावेळी जे आंदोलन झालं तेव्हा सर्वांनी एकमताने आरक्षण द्यायचं हे ठरवलं होतं. राज्यातील जनतेला मी हे सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली सगळ्यांची भावना आहे अशी आमची भूमिका आहे असंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याची कारवाई जी आहे ती सुरु झाली आहे. मात्र जेव्हा मोर्चे निघत होते त्याला काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. ते मोर्चे कुणालाही त्रास होणार नाही याच नियोजनातून निघाले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणीही घेऊ नये आणि आपली राजकीय पोळी भाजू नये असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
