सारथी आणि बार्टिच्या धर्तीवरच वंजारी समाजाच्या हिताचा विचार करु, खा श्रिकांत शिंदे
बीड येथील सभेत खा.श्रिकांत शिंदे यांचे वंजारी समाजाला आश्वासन

केशव मुंडे वेगवान मराठी बीड ८ ऑक्टोबर २०२४–लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचे काम सरकारने केले मात्र काहीजणांना आता प्रचंड पोटात दुखायला लागलंय. अडीच वर्ष सरकार असताना स्वत: घरी बसले आणि लोकांनाही घरी बसवले, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. लाडकी बहिण योजनेने पोटशूळ उठलेल्या सावत्र भावांना निवडणुकीत महिला जागा दाखवतील, असे ते म्हणाले. जनसंवाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यात आज बीड येथील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, महिलेला सक्षम करण्याचा निर्णय आजवर कोणत्याच सरकारने घेतला नाही. महायुतीने महिलांचे हात बळकट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. लाडकी बहिण योजनेविरोधात काहीजण कोर्टात गेले. ही योजना बंद करु असे बोलतात, मात्र येत्या काळात महिलांना दर महिन्याला पैसे मिळत राहणार कारण महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. जनसंवाद यात्रेचा चौथ्या टप्प्यात आज दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. शिंदे यांनी बीडमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी शिवसेना माजी आमदार अर्जून खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्ते संजय निरुपम, जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळक उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आज प्रत्येक योजना बंद करु असे विरोधक सांगतात मात्र जेव्हा अडीच वर्ष सत्तेत होते तेव्हा तुम्ही घरी बसलात आणि लोकांना घरी बसवले, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीची लोकांना गरज होती मात्र अडीच वर्षात केवळ २.५ कोटी रुपये खर्च झाले. महायुतीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्षात ३५० कोटी खर्च झाले. हे सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे, असा पुनरुच्चार खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केला. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की ७.५ एचपी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य रुपयांचे बील देऊन सरकारने आपला शब्द पूर्ण केला. एक रुपयांत पीक विमा, एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना १२५०० कोटींची मदत केली, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वसामान्यांतून पुढे आलेले आहे. गरिबी अनुभवल्याने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हेच कुटुंब या विचाराने मुख्यमंत्री दिवसरात्र काम करतात. ग्रामरोजगार सेवकांचा १७ वर्षांचा संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणात निर्णय घेऊन मार्गी लावला. पोलीस पाटील, कोतवाल, सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस या घटकांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
मराठवाड्यातील २८ तालुक्यांमध्ये हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा १.५ लाखांवरुन ५ लाख रुपये इतकी वाढवली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना राबवली. बीड विधानसभेत १ लाख ३५ हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळतोय, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. सरकारने सारथी, बार्टी सुरु केल्या तशाच प्रकारे बीड मधील वंजारी समाजाबाबत सकारात्मक विचार करणार आसल्याचे आश्वासन देऊन सर्वांना सोबत घेऊण बीडची जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागावे असे आवाहन खासदार श्रिकांत शिंदे यांनी बीड येथील सभेला संबोधित करताना केले.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.