सोयगाव तालुक्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची अद्यापही प्रतिक्षाच!
प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

वेगवान मराठी/विजय चौधरी
छत्रपती संभाजीनगर:महाविकास आघाडी सरकारच्या काळात, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी या योजनेनुळे यावेळी अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, पण काहींना नियमित कर्जफेड करून देखील अनुदानापासून अजूनही वंचित राहावे लागले सोयगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरीही या कर्जमाफीपासून वंचित आहेत
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला आता ३ वर्षे होत आली असली तरी तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन कर्जाचे वाटप करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कर्ज बुडविणाऱ्यांना कर्जमाफी झाली; पण प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान जानेवारी २०२४ मध्ये यातील काही त्रुटी दूर करून, शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पुन्हा लाभार्थी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहाव लागलं. आता आचारसंहिता संपली तरी यावर कोणताच निर्णय सरकारने न घेतल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या वतिने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्याची घोषणा केली होती. पण लोकसभेच्या आचारसंहितेमुळे याला ब्रेक लागला. आता आचारसंहिता संपली असून विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे विधानसभेची आचारसंहिता लागण्याअगोदर हे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
