
सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा जिल्हाधिकारी अविनाश पाठक
केशव मुंडे वेगवान मराठी बीड, दिनांक 17 (WEGWAN MARATHI ) :लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बीडचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मतदारांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पाठक बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, प्र. अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, बीड विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांची उपस्थिती होती.
शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम (ता.१५) घोषित केला आहे. घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज व परळी अशी सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या सहाही मतदार संघात एकूण २१ लक्ष ९७ हजार ८३० मतदार आहेत. त्यामध्ये १५ लक्ष ५८ हजार ९९८ पुरूष, १० लक्ष ३८ हजार ८०९ महिला मतदार आहेत. तृतीय पंथी मतदार २३ आहेत.
या मतदारांमध्ये दिव्यांग मतदार नऊ हजार २७२ आहेत. ज्यामध्ये पाच हजार ९८४ पुरूष, तीन हजार २८८ महिला मतदार आहेत. वय वर्ष ८५ हून अधिक मतदार ३८ हजार १४० आहेत, ज्यामध्ये १५ हजार ५२० पुरूष, २२ हजार ६२० महिला आहेत. यासह संवेदनशील मतदान केंद्रे, बॅलट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, पोलिस पथके, निमलष्करी पथके, स्थिर पथके आदींची माहितीही श्री. पाठक यांनी दिली. या माहितीसह आवश्यक त्याप्रमाणात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असल्याचेही श्री. पाठक यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने संकलित करण्यात आलेल्या निवडणुकीशी संबंधित आवश्यक माहितीची संदर्भ पुस्तिकाही उपस्थित पत्रकारांना देण्यात आली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – २२ ऑक्टोबर २०२४
नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक- २९ ऑक्टोबर २०२४
नामनिर्देशन पत्रांची छाननी- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक- ४ नोव्हेंबर २०२४
प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक- २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी दिनांक- २३ नोव्हेंबर २०२४
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक- २५ नोव्हेंबर २०२४

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.