क्राईममहाराष्ट्र

राजस्थानी मल्टिस्टेटच्या षढयंत्री संचालकांचे पाप अखेर उघडे पडले

New twist in the Rajasthani Multi-state scam case; directors seeking loopholes.

!! चार्जशीटमधून नावे गायब करण्याचा पळपुट्या संचालकांचा कट !!

!! राजस्थानी मल्टी स्टेट प्रकरणात काही संचालकांचा आता हि पोरखेळ सुरुच.!!

!! राजस्थानी मल्टी स्टेट संचालक विजय लड्डा आणि अशोक जाजू यांच्याविरोधात ठेवीदारांचा गंभीर दावा !!
वेगवान मराठी परळी / प्रतिनिधी केशव डि मुंडे दि १२ जुलै २०२६
राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले असताना, काही संचालक मात्र बनावट व खोट्या राजीनामा पत्रांच्या आधारे विविध जिल्ह्यांतील दोषारोपपत्रातून स्वतःची नावे वगळून घेण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “संचालक स्वतःची सुटका करण्यात यशस्वी होत असतील तर ठेवीदारांना न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि ढाणखी येथील गुन्ह्यांमध्ये कथितपणे खोटे दस्तऐवज सादर करून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुरवणी दोषारोपपत्रातून नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर लातूर, धाराशिव, पंढरपूर, बीड आणि परभणी येथील प्रकरणांमध्येही अशाच प्रकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील दोषारोपपत्रांतूनही नावे वगळण्यात यश आल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठेवीदारांच्या मते, जर संचालक मंडळातील व्यक्ती स्वतःची नावे दोषारोपपत्रांतून वगळण्यात यशस्वी होत असतील, तर हजारो ठेवीदारांना न्याय कसा मिळणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित संचालकांकडून जुन्या राजीनाम्यांच्या प्रती दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

राजस्थानी मल्टी स्टेटच्या घोटाळ्यात आधीच हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडलेली असताना, आता बनावट राजीनामे, दोषारोपपत्रातून नावे वगळणे आणि गायब झालेल्या मालमत्तेच्या आरोपांनी या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
………….( चौकट )
-राजीनाम्याचा दावा आणि 2023 मधील अर्जामुळे एक नाही तर अनेक प्रश्न ठेवीदारांच्या मनात उपस्थित होत आहेत

संचालक विजय लड्डा यांनी 2017 मध्ये राजीनामा दिल्याचा दावा केला असला, तरी 2023 मध्ये एका कर्जदाराच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या व्याजात सवलत देण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलकर्णी यांना संचालक म्हणून अर्ज केल्याचा दावा ठेवीदारांनी केला आहे.

त्या अर्जावर संचालक म्हणून सहमती दर्शविण्यात आल्याचे पत्र उपलब्ध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.याशिवाय, संस्थेच्या विविध कार्यक्रम, शाखा उद्घाटने, स्थलांतर आणि इतर अधिकृत उपक्रमांच्या प्रसिद्ध झालेल्या पत्रिका व वृत्तांमध्ये संबंधित संचालकांची नावे सातत्याने प्रकाशित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

संस्थेच्या वार्षिक लेखापरीक्षण (ऑडिट) अहवालांमध्येही संबंधित संचालकाचे नाव असल्याचा आरोप ठेवीदार जबाबदारीने करत आहे

आरुनोदय मार्केट मध्ये नव्याने निर्माण केलेल्या राजस्थानी मल्टिस्टेटच्या शाखेतील-60 लाखांचे इंम्पोर्टेड फर्निचर नेमके कुठे गेले ?

ठेवीदारांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. संचालक अशोक जाजू यांच्या मालकीच्या जागेत राजस्थानी मल्टीस्टेटची मुख्य शाखा स्थलांतरित करण्यात आली होती.

आणि त्या ठिकाणी सुमारे 60 लाख रुपये खर्चून एसी, फर्निचर,महागडे सोपे, टेबल, खुर्च्या, जनरेटर आणि इनव्हर्टर आदी साहित्य बसविण्यात आल्याचा दावा आहे.

संस्था बंद झाल्यानंतर हे साहित्य गायब झाल्याचे सांगितले जात असून, याबाबत प्रशासकांकडे विचारणा केली असता घरमालकां कडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

मग हे साहित्य नेमके कुठे गेले?

ते जर विक्री करण्यात आले असेल तर मग त्यासाठी न्यायालय, प्रशासक किंवा आर्थिक गुन्हे शाखेची परवानगी होती का? घेतली असेल तर ति दिली कशी ? याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.

आणि जर तुम्ही खरचं या मल्टिस्टेट चे संचालक नाहीत तुमचा या संस्थेशी संबंध नाही तर मग जेंव्हा सुरुवातीस बैंक बंद झाली आणि संस्थेचे अध्यक्ष फरार झाले तेंव्हा तुमच्या दारावर आक्रमक होऊण जाब विचारण्यासाठी आलेल्या ठेवीदारांना ५ हजार १० हजार रुपयांचे वाटप का केलात ?

इतकचं नाही तर आम्ही संचालक असलेली मल्टिटेट अवसायनात निघाल्या मुळे ठेवीदारांकडुण आमच्या जिवीतास धोका निर्मान झाला असुन आम्हाला आणि आमच्या कुटुंबास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केल्याचे पुरावे आज हि आहेत याचे उत्तर पाक पवित्र आणि स्वच्छ प्रतिमेच्या लढ्ढा आणि जाजु कडे आहे का ?

ते म्हणतात ना लबाडीच्या पांघरुणाला सरकत नसते जसं की “तोंड झापायला गेले की पाय उघडे पडतात आणि पाय झापायला गेले की थोबाड उघड पडतं”तंतोतंत अशी अवस्था लढ्ढा आणि जाजु महोद्ययांची झालेली आहे

हे महाशय इतक्यावरच थांबले नाहीत या दोन्ही संचालकांनी भरमसाठ लाच देऊन स्वताच्या मालमता जमिनी,प्लॉट,आणि घर,व दुकानं देखील MPID प्रस्तावा मध्ये जाण्यापासुण रोखण्याचा दावा करण्यात येत आहे

मल्टिस्टेट ची घटणार घडल्याच्या नंतर देखील या महाशयांनी स्वताच्या नावा वरील मालमत्ता इतरांच्या नावावर हस्तांतरीत केल्याची माहिती समोर येत आहे या सर्वांसाठी परळी शहरातील एकजन यांचा एजेंट बणुन यांचे काळे कारणाने करण्यास मदत करत असल्याची खात्रीलायक माहिती ठेवीदारांच्या हाती लागली असल्याचे सांगीतले जात आहे

या सर्व बाबींची गोळाबेरीज करुण या षढयंत्रात सहभागी असणाऱ्यांना पुराव्यासह उघडे पाडण्यात येणार असल्याचा चंग ठेवीदारांनी बांधल्याचे समजतंय त्यामुळे या प्रकरणास आता गुन्हेगारी स्वरुपाचे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असुन

आरोपींना मदत करणाऱ्यां वर गुन्हे दाखल होण्याच्या शक्यतेने आरोपींच्या संख्येत नव्याने वाढ होते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!