मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्वकांक्षी योजना असून पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन

विजय चौधरी/वेगवान मराठी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने जंगला तांडा ता. सोयगाव येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमास महिला भगिनींचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे पणन व अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त या तालुका शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. बंजारा समाजातील वाडी व तांडा वस्त्यात राहणाऱ्या महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिला भगिनींचा यावेळी ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज देखील महिलांना वाटप करण्यात आले.
या उपक्रमात महिलांना योजने संदर्भात माहिती देण्यात आली. योजनेसाठी लागणारे कागदपत्राची पूर्तता करण्यासह अर्ज भरून देण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला.
राज्यातील सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना व निर्णय घेतले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्वकांक्षी योजना असून पात्र महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, गोपीचंद जाधव, रामदास पालोदकर, जितसिंग करकोटक, बाबू चव्हाण, लखुसिंग चव्हाण आदिंसह महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
