छत्रपती संभाजी नगर

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

वेगवान मराठी

छत्रपती संभाजीनगर, :- राज्य राखीव दलाचा मला अभिमान आहे. या दलाने आपला दरारा आणि शान कायम राखली आहे. राज्य राखीव दलाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण भरीव निधी उपलब्ध करुन हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.

राज्य राखीव बल गट क्रमांक १४च्या वर्धापन दिन सोहळ्यात पालकमंत्री शिरसाट बोलत होते. राज्य राखीव बल कार्य गट क्रमांक १४ चे महासमादेशक विक्रम साळी, पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाट व हर्षदा शिरसाट यांच्यासह राज्य राखीव बलातील पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले आहेत. राखीव बलामध्ये अद्यावत साधन सामग्री उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरीव तरतूद करण्यात येईल. त्यामुळे हे दल अधिक सक्षम करण्यावर आपला भर असेल. राखीव बलाचे कोरोना काळातील यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे,असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महासमादेशक विक्रम साळी यांनी राज्य राखीव दलाच्या कामगिरीबाबत व राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिनानिमित्त निशान सलामी देण्यात आली. त्याचप्रमाणे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. विविध पुरस्काराचे वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. महासमादेशक विक्रम साळी वैद्यकीय अधिकारी रमेश कुटे, पोलीस निरीक्षक गणपती खलूली, प्रशांत गायकवाड आणि अनिल पवार यांना सन्मानित करण्यात आले. परेड संचलन प्रशांत गायकवाड यांनी केले. श्रद्धा कुलकर्णी आणि किरण स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किशन एरमोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!