छत्रपती संभाजी नगर

पत्नी, मुलांना हाकलून पतीचे मैत्रिणीसोबत घरात चाळे पत्नीने पतीच्या मैत्रिणीला गेटला बांधले

वेगवान मराठी/विजय चौधरी

छत्रपती संभाजीनगर:पत्नी व मुलांना चार महिन्यांपूर्वी घराबाहेर हाकलून मैत्रिणीसोबत चाळे करणाऱ्या पती व त्याच्या मैत्रिणीला पत्नीने चांगलाच धडा शिकविल्याची घटना बुधवारी उद्योगनगरीत घडली. संतप्त पत्नीने भावाच्या मदतीने पती व तिच्या मैत्रिणीला चोप दिला, तर पतीच्या मैत्रिणीला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधून ठेवले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली.

संजय सपकाळ (५०, नाव बदलले आहे) हा पत्नी रेखा (नाव बदलले आहे) व दोन मुलांसह वडगाव परिसरात वास्तव्यास असून, तो एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी संजयची अनामिका (नाव बदलले आहे) या महिलेसोबत मैत्री झाली.

यातून पती-पत्नीत सतत खटके उडू लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी संजयने पत्नी व दोन मुलांना घराबाहेर हाकलून देत तो एकटाच राहू लागला. एक मुलगा पुण्याला, दुसरा हैदराबादला, तर रेखा ही माहेरी निघून गेली. मग संजयने मैत्रिणीला आपल्या घरी आणून ठेवले.

पतीला चोप, बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी

रेखा दोन दिवसांपूर्वी रांजणगावात आपल्या भावाला भेटण्यासाठी आल्या. बुधवारी रेखा या भावाला सोबत घेऊन सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या घरी गेल्या असता, त्यांना पती व त्याची मैत्रीण घरात रोमान्स करीत असल्याचे दिसले.
संतप्त रेखा व तिच्या भावाने संजय व अनामिका यांना चांगलाच चोप दिला. यानंतर रेखाने अनामिकाचे हात-पाय बांधून घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवले होते. यामुळे बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

पोलिसांकडून नोंद

• या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोहेकॉ. रेखा चांदे, राजेंद्र उदे, पोकॉ. पंकज साळवे, सुहास मुंडे आदींनी घटनास्थळ गाठून गेटला बांधून ठेवलेल्या अनामिका हिची सुटका करीत तिला व संजय यास पोलिस ठाण्यात नेले. यावेळी संजय याने आजारी असल्याने मैत्रिणीला घरी बोलावून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणाची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!